भाजपची उलटी गिनती सुरू : भुजबळ
सोलापूर :पाच राज्यांमध्ये भाजपच्या पराभवानंतर सरकारची उलटी गिनती सुरू झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केले. आता राज्यात कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांच्या महाआघाडीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी ते यशवंतनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.माध्यमांची गळचेपी करणारे सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. रिझर्व्ह बॅंक, सीबीआय आदी स्वायत्त संस्थांवर सरकार आपल्या माणसांची नेमणूक करते पण तेच लोक राजीनामा देतात.यावरून सरकारच्या दहशतीची कल्पना येते, अशी टीका भुजबळ यांनी केली. सरकारने या संस्थांच्या बाबतीत जगभरात हसू करून घेतले आहे.
आगामी निवडणुकीबाबत भुजबळ म्हणाले की, शरद पवार जेथे संधी देतील तेथे काम करू. त्यांना सगळे माहीत असते. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांनी सत्कार केला.
तत्पूर्वी भुजबळ आणि विजयसिंह मोहिते यांनी बंद खोलीत दीर्घ काळ चर्चा केली. सध्याच्या अस्थिर राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल तर्क केले जात आहेत.मात्र नेमकी कशावर चर्चा झाली,याचा तपशील गुलदस्त्यातच आहे.











