राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेत
उद्धव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन
मुंबई:कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या समारंभात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवेदिता माने यांच्या हातावर शिवबंधन बांधले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कोल्हापुरातील शिवसेनेच्या दादा मंडळींना हक्काची ताई मिळाली आहे. कोल्हापुरातून सुरू झालेली ही वारी सगळीकडे पसरेल आणि सगळीकडे भगवा फडकेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसने माने गटाला सातत्याने गृहित धरल्याने तसेच हातकणंगले मतदारसंघ माने गटाचा असताना अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना उमेदवारी बहाल करण्याचे ठरवल्याने माने गट बिथरला होता. शेट्टी आणि माने गट यांच्यात राजकीय वैमनस्य पूर्वीपासूनच आहे. परंतु माने गटाला; डावलून पवार यांनी शेट्टी यांना जवळ केल्याने निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. भाजप की शिवसेना असे दोन पर्याय त्यांच्यापुढे होते. त्यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला. निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी अगोदरच शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजू शेट्टी मतदारसंघात लोकप्रिय असले तरीही माने गट त्यांना जोरदार टक्कर देईल, अशी चर्चा आहे.
यापूर्वी निवेदिता माने यांनी लोकसभेत हातकणंगलेचे प्रतिनिधित्व केले आहे. आता शेट्टी तेथील खासदार आहेत. माने गटाची मतदारसंघातील ताकद पाहता लोकसभेला शेट्टी आणि धैर्यशील माने अशीच लढत होण्याची शक्यता आहे. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना माने त्यांच्या भेटीला गेले नव्हते. तसेच पवार आणि शेट्टी यांची भेट झाल्यानंतर भावी समीकरण काय असेल ते स्पष्ट झाले होते.










