कोणाला भकास करून विकास करायचा नाही : उध्दव ठाकरे
मुंबई : शिवसेनेचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समजल्या जाणा-या कोस्टल रोडचे भूमीपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले. केले.हा कोस्टल रोड टोल फ्री असेल, अशी घोषणा करत कोणाला भकास करून विकास करायचा नाही, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांच्या भूमीपूजनावरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय नाट्य रंगले असतानाच शिवसेनेने भाजपला डावलत शिवसेनेचा महत्वाकांक्षी समजल्या जाणा-या कोस्टल रोडचे भूमीपूजन केले.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज या कोस्टल रोडचा भूमीपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाकरे यांनी मुंबईकरांच्या महत्वाच्या विकासकामात आडवे न आल्याबद्दल राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानले.या प्रकल्पामुळे कोळी बांधवांचे कोणतेही नुकसान होणार नाही असे स्पष्ट करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कोणाला भकास करून विकास करायचा नाही असे सांगून हा कोस्टल रोड टोल फ्री असेल, अशी घोषणा ठाकरे यांनी केली.
भुलाभाई देसाई राेड, अमरसन्स उद्यान येथून या कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात होणार असून, पुढील चार वर्षात याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर निविदा मागविण्यात येवून, याबाबतची नाेटीस सर्व देशांमधील दूतावासात लावण्यात आली हाेती. त्यामुळे महापालिकेचा पारदर्शक कारभार दिसला असेल, असा टाेला ठाकरे यांनी नाव घेता भाजपला लगावला.
मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीदरम्यान सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्यात येत आहे . पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सागरी सेतूदरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्यात येणार आहे. या टप्प्यातील प्रकल्पाच्या कामाची जबाबदारी पालिकेवर असणार आहे.










