भावी मुख्यमंत्री म्हणू नका; त्यामुळेच माती झालीय : अजित पवार
बारामती : आरे.. मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका, भावी मुख्यमंत्री म्हटल्याने कोणाच्या भावना दुखावल्या जातात आणि पाडापाडीचे राजकारण होते या पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे,असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व्यक्त केले आहे.
बारामतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम पार पडला. आपल्या भाषणात एका स्थानिक नेत्याने अजित पवार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला होता. तोच धागा पकडून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आपल्याला भावी मुख्यमंत्री किंवा शरद पवार यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करु नये असे आवाहन त्यांनी केले. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बहुमत कसे मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण होते आणि या पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
कोणी काय करावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे असे मत त्यांनी माजी खासदार निवेदिता माने यांच्या शिवसेना प्रवेशाविषयावर व्यक्त केले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार थातूर मातूर उत्तरे देतात अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली. पाच राज्यात भाजपची पिछेहाट झाली असल्यामुळेच कर्जमाफी देऊन गमावलेला जनाधार मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाकडून सुरु असल्याचीही टीका पवार यांनी केली.










