शिवस्मारकाच्या भूमीपूजनाचा पुन्हा घाट
मुंबई: राज्यातील राजकीय वादाचा विषय ठरलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमीपूजन २० डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.यावेळी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. मात्र भूमीपूजन करण्याची घाई निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत करण्याचा डाव रचल्याचा आरोप केला जात आहे. शिवस्मारक कायम राजकीय वादात अडकले आहे.
अगोदर भूमीपूजन ४ डिसेंबरलाच करून घेण्याची घाई मेटे यांना झाली होती. त्यांनी तशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या होत्या. परंतु इतक्या थोड्या अवधीत तयारी करणे शक्य नाही, असे त्यांना कळवण्यात आले. त्यामुळे आता २० डिसेंबरचा मुहुर्त ठरवण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. एकदा निवडणूक आचारसंहिता लागली की भूमीपूजन शक्य नाही. म्हणूनच ही लगीनघाई सुरू आहे.
२४ ऑक्टोबरला भूमीपूजन ठरले होते. पण भूमीपूजनासाठी जाणाऱ्या बोटीला अपघात होऊन एकाचा मृत्यु झाला. यावर मोठा राजकीय वाद झाला होता. सरकारला भूमीपूजनाची इतकी घाई का, असा सवाल केला गेला. त्या अपघाताची चौकशीही पूर्ण झालेली नाही. त्यातच आता नव्याने भूमीपूजनाचा घाट घालण्यात आला आहे.










