अयोध्येत गेलो नसतो तर मंदिर मुद्दा शरयूच्या गाळात रूतला असता : उद्धव ठाकरे

अयोध्येत गेलो नसतो तर मंदिर मुद्दा शरयूच्या गाळात रूतला असता : उद्धव ठाकरे

मुंबई:राम मंदिराच्या विषयावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयातून पुन्हा भाजपला खडे बोल सुनावले आहेत. आपण अयोध्या दौऱ्यावर गेलो म्हणूनच तर राम मंदिराचा विषय चर्चेत आला. आपण अयोध्येत गेलो नसतो तर हा विषय शरयूच्या गाळातच रूतला असता आणि मतांसाठी पुन्हा याच शरयू नदीत डुबक्या मारण्याचे प्रयोग सुरू झाले असते, असा सणसणीत टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

आक्रमक भाषेत लिहिलेल्या संपादकीयात ठाकरे म्हणतात की, २५ वर्षे राम उघड्या तंबूत आहे आणि आपण सत्तेच्या खुर्च्या उबवतो आहोत. रामाला चांगले दिवस कधी येणार? राजनाथ म्हणतात संयम. गडकरी म्हणतात सहमती. सरसंघचालक म्हणतात रामाचीही वेळ येईल. राम मंदिरावर कुणी काही बोलायचे नाही. राम मंदिरावर अध्यादेश काढणे बाजूलाच राहिले, ज्यांनी मंदिरासाठी बाबरी मशिद पाडली त्यांच्या़वरील खटलेही काढले नाहीत, याबद्दल ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले आहे. लालकृष्ण अडवाणी आता राष्ट्रपती होत नाहीत. तेव्हा बाबरी प्रकरणातील खटले काढून टाकण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे. बाबरी कोर्ट बरखास्त करा आणि इथे तरी सहमती होऊ द्या, असा टोला गडकरींना लगावला.

अयोध्येत मंदिर उभारण्यासाठी भाजपवर आतूनच दबाव असल्याचे नमूद करतानाच भाजपचेच लोक मंदिर कधी होणार, असा प्रश्न विचारत आहेत. परंतु भाजप हायकमांडकडे त्याचे उत्तर नाही, अशी टीका केली आहे. राम मंदिर प्रश्नावर भाजपमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य चालवणाऱ्यांकडे कोणतीही ठोस उपाययोजना नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे.

Previous articleशिवसेना – भाजप निम्म्या निम्म्या जागा लढवणार ?
Next articleकांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपयांचे अनुदान