शिवसेना – भाजप निम्म्या निम्म्या जागा लढवणार ?
मुंबई:राज्यात सर्वाधिक चर्चिला जाणारा एकच मुद्दा शिवसेना आणि भाजप हे सत्तेतील सतत भांडणारे पक्ष युती करणार का, हाच आहे. युती होण्याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत असल्या तरी पडद्यामागे युतीसाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी १४४ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव शिवसेनेने दिला आहे. अर्थात भाजपने अद्याप त्यावर काहीही संकेत दिलेले नाहीत.
सत्तेतील मित्रपक्ष म्हणवणारे भाजप आणि सेना यांच्यात नेहमीच कुरबुरी सुरू असतात. शिवसेनेने तर भाजपवर टीकेचे कठोर प्रहार केले आहेत. त्यामुळे भाजप सेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील, असेच समजले जात होते. पण एकत्र निवडणूक लढवण्याशिवाय दोन्ही पक्षांना पर्याय नाही. तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपची अडचण झाली आहे. तर सेना स्वतंत्रपणे लढली तर सेनेचे जास्तीत जास्त चार खासदार निवडून येतील, असे सर्व्हे सांगतात. म्हणून दोन्ही पक्षांनी युतीसाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.
जागावाटपाचा अधिकृत प्रस्ताव भाजपकडे दिला नसला तरी त्यावर उभय पक्षाच्या नेत्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती फिफ्टी फिफ्टीच्या सूत्रावरच फिसकटली होती. आता पुन्हा त्यांच्यात चर्चा सुरू होत आहे.
ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे कॉंग्रेस राष्ट्रवादीचेच सूत्र भाजप शिवसेनेनेही स्वीकारलेले आहे. त्यामुळे अधिक जागांची मागणी करण्यास महत्व आले आहे.











