शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्यांना आमची मदत कमीच वाटणा :  खोत

शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्यांना आमची मदत कमीच वाटणा :  खोत

सांगली: राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल दोनशे रूपये अनुदान जाहीर केले. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली होती. त्यांना आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार उत्तर दिले. शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्यांना आमची मदत कमीच वाटणार, असा टोला खोत यांनी दोन्ही नेत्यांना लगावला.

ते म्हणाले की, आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले आहे, याकडे जास्त लक्ष देतो. राज ठाकरे आणि जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर खोत म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे, एवढे समजण्याइतके सरकार शहाणे आहे. शेतात काम करून आलेली आणि शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केलेली आमच्यासारखी माणसे या सरकारमध्ये आहेत. आम्हाला शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतमालाची काळजी आहे, असेही खोत म्हणाले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात किलोला ५० पैसे ते एक रूपया मदत देण्यात आली होती. आम्ही किलोमागे दोन रूपये मदत केली आहे. म्हणजे आम्ही आघाडी सरकारपेक्षा दुप्पट मदत केली आहे, असे खोत यांनी सांगितले.राज ठाकरे यांनी कांद्याला सरकारने दिलेले अनुदान मान्य नसल्याचे म्हटले होते. तसेच मंत्री ऐकत नसतील तर कांदे फेकून मारा, असा सल्ला कांदा उत्पादकांना दिला होता.

 

Previous articleसंगीतकार लक्ष्मीकांत यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर
Next articleपुण्याची जागा कॉंग्रेस लढणार ; राष्ट्रवादीची माघार