पुण्याची जागा कॉंग्रेस लढणार ; राष्ट्रवादीची माघार
पुणे: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील पुणे लोकसभा जागेवरून सुरू झालेली रस्सीखेच राष्ट्रवादीने माघार घेतल्याने संपुष्टात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीने दावा सोडला असून ही जागा आपल्याकडे राखण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.
शरद पवार यांनीच पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण पवारांनी आपण लोकसभा लढवणार नसल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादीने हक्क सोडून दिला. त्यामुळे आता ही जागा कॉंग्रेस लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.२०१४ ला पुणे मतदारसंघ कॉंग्रेसकडेच होता. मात्र मोदी लाटेत अनिल शिरोळे यांनी कॉंग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता.पुण्याचा पेच सुटला असला तरी यवतमाळ, सिंधुदुर्ग,औरंगाबाद, अहमदनगर, रावेर आणि नंदूरबार या जागांवरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेला तिढा कायमच आहे. या जागांसाठी चर्चांचे गुऱ्हाळ सुरू आहे.
राष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे प्रत्येकी २४ जागा दोन्ही पक्षांनी लढवाव्यात, असा प्रस्ताव दिला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासाठी कॉंग्रेसने अहमदनगरची जागा मागितली आहे.राष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे प्रिया दत्त यांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ मागितला आहे. प्रिया दत्त आता निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत. परंतु कॉंग्रेसचे कृपाशंकर सिंह आणि अभिनेत्री नगमा यांनी कॉंग्रेसतर्फे येथून निवडणूक लढवण्यात रस दाखवला आहे. त्यामुळे पुण्याचा पेच सुटला असला तरी बाकीच्या जागांचा पेच कसा सोडवला जातो, यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची कसोटी आहे. अन्य ४० जागांबाबत मात्र सहमती झाली आहे.











