काॅग्रेस मित्रपक्षांसाठी फक्त एक जागा सोडणार ?

काॅग्रेस मित्रपक्षांसाठी फक्त एक जागा सोडणार ?

मुंबई: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची लोकसभेसाठी जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. यात भारिप बहुजन महासंघाला अकोल्याची तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघाची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यास कॉंग्रेस उत्सुक आहे. परंतु एमआयएमची साथ त्यांनी सोडावी, अशी अट कॉंग्रेसने घातली आहे. आंबेडकर यांना ती मान्य नाही. शिवाय आंबेडकरांनी आघाडीकडे १२ जागांची मागणी सुरूवातीपासून केली आहे. तेवढ्या जागा त्यांना सोडणे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला अशक्यच आहे. त्यामुळे आंबेडकर आघाडीत सहभागी होणार नाहीत, हे जवळपास ठरल्यासारखेच आहे. मात्र आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करून निवडणूक लढवल्यास धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट होऊन आघाडीला फटका बसू शकतो, हे कॉंग्रेसला माहीत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहा जागांची मागणी केली होती. त्यालाही कॉंग्रेसने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. एकमेव हातकणंगले मतदारसंघ शेट्टी यांच्यासाठी सोडण्याची तयारी कॉंग्रेसने दाखवली आहे. यामुळे शेट्टी प्रचंड नाराज असल्याचे कळते. तेही कदाचित आघाडीत सहभागी होण्याबाबत फेरविचार करू शकतात. शेट्टी यांनी सहा जागा मागितल्या असल्या तरी हातकणंगले, वर्धा, बुलडाणा आणि माढा या जागांसाठी शेट्टी यांचा आग्रह आहे. तो मान्य करणे कॉंग्रेसला शक्य नाही. त्यामुळे जागावाटप फिसकटल्यात जमा आहे, असे सूत्रांनी सांगितले. एका जागेसाठी आंबेडकर कॉंग्रेसबरोबर जाणार नाहीत.

Previous articleपुण्याच्या जागेवरील हक्क सोडलेला नाही : अजित पवार
Next articleकॉंग्रेस राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेकार :राज ठाकरे