कॉंग्रेस राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेकार :राज ठाकरे
नाशिक: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेकार आहे. पाच राज्यांत भाजपचा पराभव झाला तो पंतप्रधान मोदींविरोधातील जनतेचा राग बाहेर पडला आहे. भाजप स्वत:साठी खड्डे खणत आहे, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केली. सध्या ते नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे.
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, विरोधी पक्ष कधीच जिंकत नाहीत तर सत्ताधारी हरत असतात. लोकसभा निवडणुकीतही भाजपचे धोरणच त्यांच्या पराभवाला कारण ठरणार आहे, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधानपदासाठी गेल्या कित्येक वर्षापासून पर्याय नव्हताच. अगदी पंडित नेहरूंच्या काळातही पर्याय नव्हता. तरीही पर्याय पुढे आले तसेच मोदी यांनाही पर्याय पुढे येईलच. राम मंदिर मुद्यावर सरकारने दंगली घडवण्याचा कट रचला आहे, याचा त्यांनी पुनरूच्चार केला. सरकारकडे एक रूपया शिल्लक नाही. फक्त सरकार घोषणा करत आहे. कांदा उत्पादकांना सरकारने कशाच्या जोरा़वर अनुदान जाहीर केले, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
येत्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची दुर्दशा होईल, असे त्यांनी सांगितले.सरकार जेवढे संगणकावर लक्ष ठेवेल तेवढे त्यांना समजेल की मोदींना शिव्या पडत आहेत. किती लोकांच्या घरात घुसणार आहेत. आधी लोकांचे पैसे काढले. आता घरात घुसून पाहणार का, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी होतील का, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, आधी ते पायावर फावडे मारून घेतील आणि नंतर कुदळ मारून घेतील. दोन्ही अकाच वेळी मारणार नाहीत.
नोटबंदीनंतर मोदींनी खड्डा खणला आहे, असे आपण म्हणालो होतो. निवडणुका जवळ येतील तसे हे रोज खड्डे खणत जातील. मूळ मुद्यावरून लक्ष दुसरीकडे वळवायचे हे आता लोकांना समजू लागले आहे. देशातील वातावरण घाण झाले आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. जानेवारीत पुन्हा आपण नाशिक दौरा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले.











