नेतृत्वाने अपयशाची जबाबदारीही घेतली पाहिजे : गडकरी
पुणे:अपयशाची जबाबदारीही घेण्याची क्षमतादेखील नेतृत्वात असली पाहिजे. त्यातूनच नेत्याची संस्थेशी असलेली बांधिलकी दिसते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. गडकरी यांनी सहकारी संस्थांच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केले असले तरीही पाच राज्यांतील भाजपच्या पराभवाशी त्यांच्या या वक्तव्याशी संबंध जोडला जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनतर्फे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बॅंकांचा गौरव गडकरींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सहकार क्षेत्रातील नेतृत्वाला कानपिचक्या देताना गडकरी म्हणाले की, सहकार क्षेत्रात व्यावसायिकता हवी असली तरी कॉर्पोरेट संस्कृती नको. निवडणूक हरल्यानंतर प्रत्येक जण दुसऱ्याकडे बेट दाखवतो. पक्षाने पैसे दिले नसल्याचे सांगतो. नेतृत्वाने अपयशाची जबाबदारीही घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हणताच खळबळ उडाली. अनेकांनी या वक्तव्याचा संबंध पाच राज्यांतील भाजपच्या पराभवाशी जोडला. सरकारने नेहमी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. कॉंग्रेसचे सरकार असले की भाजपच्या संस्थांवर कारवाई आणि भाजपचे सरकार आले की कॉंग्रेसच्या संस्थांवर कारवाई हे थांबले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.










