मुंबई नगरी टीम
मुंबई: माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष चांगलाच भडकला आहे. निलेश राणे यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केल्यानंतर त्यांचे धाकटे भाऊ नितेश राणे हेही आपल्या भावासाठी मैदानात उतरले आहेत. अंगावर आले तर शिंगावर घेऊ, आमच्या नादी लागायचे नाही, असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे.
निलेश राणे यांनी काल आनंद दिघे यांच्या मृत्युसंदर्भात बाळासाहेबांवर गंभीर आणि सनसनाटी आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेत क्षोभ उसळला. मात्र नितेश राणे यांनी निलेश यांच्यामागे आम्ही सर्व आहोत.अंगावर आले तर शिंगावर घेणारच, असा इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे. निवडणूक आणखी जवळ येईल तसे राजकीय पक्षांमधील आरोप प्रत्यारोप आणखी खळबळजनक होत जाणार आहेत. राणे आणि शिवसेना यांच्यातील वैर तर जुनेच आहे. मात्र निलेश राणे यांच्या आरोपांना शिवसेनेच्या नेत्यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. याअगोदर पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि राणे पुत्र यांच्यातील कलगीतुरा रंगला होता. कदम यांनी नारायण राणे यांना कोकणवरील काळा डाग म्हटले होते तर नितेश आणि निलेश राणे यांनी कदम मातोश्रीवरील कुत्रा असल्याचे उत्तर दिले होते.पण आता निलेश राणे यांनी थेट बाळासाहेबांवरच गंभीर आरोप केले होते.