शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाहीत : राजू शेट्टी

मुंबई नगरी टीम

अहमनगर: राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले.पण त्यानंतरच्या उपाययोजना कराव्या लागतात त्या केल्याच नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे संवेदनशील लोक सरकारमध्ये नाहीत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी आज भाजपवर केली.

पाथर्डी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जनावरांसाठी छावणी सुरू केली आहे. मात्र या छावणीचे पाणी लोकप्रतिनिधी अडवत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यासाठी शेट्टी आले होते. आता पाणी कोण अडवतो तेच बघतो, असेही शेट्टी म्हणाले.

त्यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. दुष्काळ पडला आहे हे जाहीर सांगण्याची आवश्यकता नव्हती.सवलती कधी देणार याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी उद्योगपतीच लूट करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकारला अजून दुष्काळाची दाहकता कळत नाही.सरकारने शेतकऱ्यांवर वाईट वेळ आणली असून शेतकऱ्यांच्या हिताची बाजू घेणारे लोक सरकारमध्ये नाहीत, असे शेट्टी म्हणाले.सरकारने अनुदान दिले नाही तरी घाबरू नका.ही छावणी दुष्काळ संपेपर्यंत सुरू राहील, असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला.जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जिवाशी खेळ केला, असा आरोपही त्यांनी केला.

Previous articleअंगावर आले तर शिंगावर घेऊ : नितेश राणे
Next articleमंत्र्यांनी आपल्या अपयशी कारभाराचा विचार करावा :  खा. अशोक चव्हाण