मुंबई नगरी टीम
जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी पक्षाने सोपवले तर बारामतीही जिंकून दाखवू,असे आव्हान दिले होते.त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुम्ही बारामतीला याच,मग दाखवतो,असे प्रतिआव्हान दिले होते.त्यासंबंधी विचारल्यावर आज महाजन यांनी विषयाला बगल दिली.वादाचे मुद्दे नकोतच.विकासकामे करू या,असे उत्तर त्यांनी दिले.
महाजन आणि अजित पवार यांच्यात बारामती पालिकेवरून जोरदार सामना झाला होता.धुळे पालिकेत आपल्या जोरावर महाजन यांनी भाजपला प्रचंड यश मिळवून दिले.त्यानंतर बोलताना महाजन यांनी बारामती पालिकेतही भाजपला निवडून आणेन,असे म्हटले होते.त्यावर संतापलेल्या अजित पवारांनी जळगाव येथील परिवर्तन यात्रेत बारामतीला येऊनच दाखवा,असे प्रतिआव्हान दिले.विधान परिषदेतील विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी महाजन आता निवडून येऊनच दाखवा,असे आव्हान दिले.तेव्हा गिरीष महाजन यांनी आज बोलताना वादाचे मुद्दे नकोत असे सांगत विषयच टाळला.राज्यात विकासकैमे करायची आहेत.त्याबाबत बोलू या,असे महाजन म्हणाले.अजित पवारांच्या प्रतिआव्हानानंतर महाजन यांनी अचानक आपली भाषा का बदलली,अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.