मुंबई नगरी टीम
सातारा : एका महिन्यानंतर माझे लग्न ( लोकसभा निवडणुक) नंतर तुम्हा सर्वांचे ( विधानसभा निवडणुक ) आहे असे सांगत साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपवर स्तुतीसुमने उधळली.यापूर्वीच्या आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवल्याने उदयनराजे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपला जवळ करणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
दौलतनगर-मरळी (सातारा) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाचे उद्घाटन आणि पाटण तालुक्यात ५२ नवीन नळ योजनांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमात आपल्या भाषणात साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आघाडी सरकारचा समाचार घेतानाच भाजपवर स्तुतीसुमने उधळली.भाजप आणि सेना सरकारच चांगले असून, त्यांच्या मंत्रिमंडळात जे निर्णय झाले, ते यापूर्वी झाले नाहीत. यापूर्वी फक्त घोषणा झाल्या; पण अंमलबजावणी झाली नाही,’ अशी टीका त्यांनी केली.
‘मी काय आहे, हे मला माहीत आहे. एका बाजूला मुख्यमंत्री आणि माझ्या दुसऱ्या बाजूला पालकमंत्री बसले आहेत. त्यामुळे माझी अवस्था उंदरासारखी झाली आहे; पण एक लक्षात ठेवा, एक महिन्यानंतर माझे लग्न आहे आणि नंतर तुमचे.’ या उदयनराजे भोसलेंच्या या मिश्किलीवर हशा पिकला.
या कार्यक्रमाला बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, मंत्री सदाभाऊ खोत, मंत्री बबनराव लोणीकर, खासदार उदयनराजे भोसले, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित पाटील, आमदार उदय पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार अनिल बाबर उपस्थित होते.