मुंबई नगरी टीम
अहमदनगर: गेल्या चार दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणास बसले आहेत.परंतु राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची कसलीही दखल घेतलेली नाही. तसेच सरकारचा एकही मंत्री आलेला नाही. यामुळे राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ सरकारविरोधात संतप्त झाले आहेत.पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयातून अण्णांना फक्त आपले पत्र मिळाले.धन्यवाद असे त्रोटक पत्र आले आहे.यामुळे अण्णा हजारेही खवळले असून त्यांनी माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास मोदीच जबाबदार असतील,असे आज म्हटले आहे. हे प्रकरण आता राजकीयदृष्ट्या चांगलेच पेटले आहे.
लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी अण्णांनी चार दिवसांपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू केले आहे.पण सरकारने दखल न घेतल्याने अण्णांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.आज त्यांनी रास्ता रोकोही केला.अण्णांची प्रकृती उपोषणामुळे खालावली असून पंतप्रधान कार्यालयाने खिल्ली उडवणारे पत्र पाठवल्याने तर अण्णा चांगलेच भडकले. त्यामुळेच त्यांनी माझे काही वाईट झाल्यास मोदी जबाबदार असतील,असे म्हटले आहे.अण्णांचे वजन साडेतीन किलोने घटले असून रक्तदाब स्थिर आहे. मात्र अण्णांना जास्त बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे.
दरम्यान,भाजपसाठी मात्र अण्णांचे उपोषण डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. सरकारने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना चर्चेला पाठवले होते.पण त्यांना परत पाठवण्यात आले.त्यानंतर सरकारने थंडपणा स्वीकारला आहे.