पंतप्रधानांच्या भेटीकरीता लायकी व क्षमता पाहिली जाते ; दरेकर यांचा राऊतांना टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंतप्रधान भेटीकरता लायकी आणि क्षमता बघून भेट ठरत असते. यात संजय राऊत बसतात की नाही हे मला माहीत नाही,असा खोचक टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राऊतांना लगावला.

पंतप्रधानांनी आम्हाला चहा प्यायला बोलवायला पाहिजे होते. पण ते आम्हाला पाणीसुद्धा विचारत नाहीत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. माध्यमासोबत यावर बोलताना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान हे आपल्या देशाचे सर्वोच्चपदी असणारे पद आहे. त्यामुळे पंतप्रधान भेटीकरता नियमावलीचे पालन केले जाते. पंतप्रधानांना कोणालाही भेटता येत नसून समोरच्याची लायकी आणि क्षमता बघून भेट ठरत असते, अशी टीका दरेकर यांनी संजय राऊतावर केली.आम्ही केवळ पॅकेज जाहीर करणारे, घोषणा करणारे मंत्री नाही, असा दरेकर यांनी आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवरही भाष्य केले.कांगावा करणाऱ्यांनीच आज पॅकेज जाहीर केले आहे. राज्य सरकारने पुरेशी, तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्यामुळे आता केवळ नुकसानग्रस्त भागांना तात्काळ मदत द्यावी, घोषणा केलेल्या मदतीची अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्य सरकारने लक्ष घालावे. मागील मदतीप्रमाणे ही मदत सुद्धा कंत्राटदाराच्या खिशात घालू नये,असा खोचक टोला दरेकर यांनी लगावला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त नागरिकांसाठी आज मदत निधीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती आणि इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, त्यावर दरेकर म्हणाले की, पुरेशी अशी मदत जाहीर झाली असली तरी अशा आर्थिक परिस्थितीमध्ये ११ हजार ५०० कोटीचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तौक्ते चक्रीवादळ असो किंवा निसर्ग चक्रीवादळ या संकट काळात जी मदत राज्य सरकारकडून जाहीर झाली त्या मदतीपैकी ६० टक्के लोकांना अद्याप मदतच मिळाली नाही. असा आरोप करुन दरेकर यांनी सांगितले, राज्य सरकारने जी ११ हजार ५०० कोटी रक्कम जाहीर केली आहे, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे अशा पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळाली पाहिजे. नाहीतर या पॅकेजमधील पैशाची व्यवस्था रस्त्यावर, पुलावर कंत्राटदाराच्या बिलासाठी केली जाईल, जी मागील पॅकेजमध्ये केली गेली. मागील पॅकेजमधील ५० टक्के रकमेचा वापर रस्ते, पूल, कंत्राटदारांसाठी केला गेला.त्यामुळे मागील पॅकेजचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना काही फायदा झाला नसल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.

Previous articleपूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर : वाचा- कोणत्या नुकसानीसाठी किती मिळणार मदत ?
Next articleआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय