मुंबई नगरी टीम
नागपूर: केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी काही दिवसांपासून आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत.त्यांचे प्रत्येक विधान हे पक्षनेतृत्वाला टोला आहे असेच घेतले जाते.मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांनी गडकरींची पाठराखण केली आहे.षड्यंत्र करणे हा गडकरींचा स्वभाव नाही,असे भागवतांनी म्हटले आहे.
गडकरी यांनी काही दिवसांपासून जी विधाने केली ती पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना उद्देश्यून केली असल्याचे मानले गेले.पक्षनेतृत्वाने अपयशाचीही जबाबदारी घेतली पाहिजे,जो घर सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार अशी त्यांची वक्तव्ये मोदींच्या विरोधात असल्याचा अर्थ लावला गेला.त्यावर भागवत म्हणाले की,गडकरी सौम्य स्वभावाचे आहेत.कटकारस्थान करणे त्यांच्या स्वभावात नाही.त्यांच्या मनात जर काही इच्छा असेल तर ते सर्वात आधी मला सांगतील.लोकांना दाखवलेली स्वप्ने पूर्ण केली नाहीत तर लोक धुलाई करतात या गडकरींच्या विधानामुळे भाजपची चांगलीच पंचाईत झाली होती.
तीन राज्यांतील पराभवानंतर अचानक गडकरींचे नाव पंतप्रधान म्हणून चर्चेत आले.नेमकी त्यानंतरच गडकरी यांनी पक्षनेतृत्वाला टोला वाटतील अशी विधाने करण्याचा सपाटा लावला.त्यामुळे गडकरी पंतप्रधानांना आव्हान देण्याच्या पवित्र्यात असल्याचे चित्र तयार झाले.पण आता भागवत यांनी गडकरी यांची पाठराखण करतानाच गडकरी यांनी काही इच्छा असेल तर ती दाबून टाकावी,त्यांना संघाचा पाठिंबा नाही हेही अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे.