लोकप्रियता ओसरल्यास संघाकडून नरेंद्र मोदींचा अडवाणी होईल !

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अधिक घसरल्यास,९० च्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना जसे संघाने कालांतराने बाजूला केले तसेच काही महिन्यात मोदी यांना बाजूला करेल असे भाकित वर्तवितानाच संघटनेपेक्षा कुठल्याही आपल्या व्यक्तीला एका मर्यादित लोकप्रियतेपेक्षा संघ मोठे होवू देत नाही.तसेच, ‘गरज सरो वैद्य मरो’ या तत्वानुसार प्रभुत्व गमवणाऱ्या व्यक्तीला संघ अलगदपणे बाजूला सारतो, असा टोमणा काँग्रेसचे माजी आमदार व प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी लगावला आहे.

कोरोनाची पहिली लाट थोपवून धरल्याची केंद्रीय नेतृत्वाने केलेली भ्रामक कल्पना, स्तुतिसुमनांच्या घंटानादामुळे तज्ञांच्या इशाऱ्याकड़े केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य, कुंभमेळा व पाच राज्यांच्या निवडणूक आयोजनातून दाखविलेली अपरिपक्वता, त्यानंतर कृतीतील बेसावधपणा यामुळे दूसरी लाट हाताबाहेर गेली.पाठोपाठ, लसीकरण धोरणात उडालेला गोंधळ,लसीकरण प्रक्रियेचे फसलेले नियोजन,परदेशी औषध कंपन्यांना सुरवातीस नाकारत केवळ दोनच भारतीय कंपन्यांवर अवलंबून राहिल्याने प्रचंड मंदावलेल्या लसीकरणाचा वेग की ज्यामुळे अजून वीस टक्के सुद्धा भारतीयांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही,त्यातच, १०-१२ वी च्या परीक्षा निर्णय बैठकीस शिक्षणमंत्र्याऐवजी संरक्षणमंत्र्यांना पाठविण्याचा विनोद,यावरून केंद्रात कश्याचाच ताळमेळ राहिला नसल्याचे आता स्पष्ट झाल्याची टीका गाडगीळ यांनी केली आहे.

भरीतभर खुद्द उत्तर प्रदेशातील शेकडो मृतदेहांच्या सामुदायीक दहनाचे परदेशी वृतपत्रांनी प्रसिद्ध केलेले फोटो, गंगेतून वाहणाऱ्या मृतदेहांचे व्हायरल विडिओ, यामुळे मोदींजीच्या प्रतिमेस तडा गेला. संघाला अखेरीस दिल्लीत चिंतन बैठक बोलवावी लागली. दुसरीकडे अचानकपणे नितिन गडकरी यांच्या विविध भाषणांचे व कार्याचे वीडियो व्हायरल होवू लागणे ह्याला बराच अर्थ आहे.पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता अधिक घसरल्यास, ९० च्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अडवाणीजींना जसे संघाने कालांतराने बाजूला केले तसेच काही महिन्यात मोदींना बाजूला करेल असा राजकीय अंदाज गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleविरोधकांना काहीच कामधंदा नसल्याने ते ‘ती’ गोष्ट उकरून काढत आहेत : अजितदादांचा भाजपला टोला
Next articleपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन