दिव्यांग प्रवाशांना वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये ७० टक्के सवलत

मुंबई नगरी टीम

मुंबई : एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री  दिवाकर रावते यांनी केली. शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे, असे मंत्री  रावते यांनी सांगितले.

मंत्री  रावते म्हणाले की, एसटी महामंडळाने काही काळापुर्वी सुरु केलेली शिवशाही बस लोकांच्या पसंतीस उतरली आहे. राज्यभरात सर्व ठिकाणी प्रवाशांकडून शिवशाही बसला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीस या बसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत देण्यात येत नव्हती. पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरीक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी भाडे सवलत देण्यात आली आहे. अंध, अपंगांनाही अशी सवलत देणे अत्यावश्यक असल्याने तसेच अंध, अपंगांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची भेट घेऊन केलेल्या विनंतीस अनुषंगून या विनंतीचा सन्मान म्हणून अंध, अपंगांनाही आता शिवशाही बसमधून प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे मंत्री  रावते यांनी सांगितले.

महामंडळामार्फत अंध आणि अपंगांना सध्या साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येते. याशिवाय त्यांच्या साथीदारास साध्या व निमआराम बसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलीत शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या एसटी महामंडळाच्या अंध आणि अपंगांसाठी असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. आता त्यांना शिवशाही बसमधून प्रवासभाडे सवलत मिळणार असल्याने राज्य शासनावर अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले.

Previous articleपंकजाताईंसाठी मीच २००९ ला आमदारकी सोडली : धनंजय मुंडे
Next articleसत्तेसाठी अर्धे कमळ छातीवर लावतील : निलेश राणे