सत्तेसाठी अर्धे कमळ छातीवर लावतील : निलेश राणे

मुंबई नगरी टीम

सावंतवाडी: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे आणि शिवसेनेतील कलगीतुरा रंगला आहे.निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर नवा हल्ला चढवताना शिवसेनावाले सत्तेसाठी अर्धे कमळ छातीवर लावून फिरतील,असे म्हटले आहे.यामुळे आता हा वाद नव्याने पेटणार असून शिवसेनेकडूनही तितकेच तिखट उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रचार धोरण ठरवणारे निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन भेट घेतली.त्यासंदर्भात निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.निलेश राणे यांनी ट्विट करताना प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र टाकले असून ते राजीनामेही फाडून टाकायला सांगा,असाही टोला लगावला आहे.शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत आहेत,असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते.त्याचा संदर्भ राणे यांच्या ट्विटमागे आहे.

निलेश राणे यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.राहुल गांधी यांनी किमान वेतन देणार असल्याचे जाहीर केले होते.त्यावर किमान वेतन म्हणजे नेमके काय,असा खोचक सवाल केला आहे.निलेश राणे यांनी याअगोदरही शिवसेनेवरच नव्हे तर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही हल्ले केले होते.आनंद दिघे यांची हत्या बाळासाहेबांनीच घडवून आणली असा सनसनाटी आरोप निलेश राणे यांनी केला होता.तसेच सोनू निगमचे बाळासाहेबांशी असलेले नाते सांगायला लावू नका,असेही ते म्हणाले होते.आता नव्याने त्यांनी शिवसेनेला डिवचले असून शिवसेना कसे उत्तर देते याची उत्सुकता आहे.

Previous articleदिव्यांग प्रवाशांना वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये ७० टक्के सवलत
Next articleनरेंद्र मोदींकडून सूडाचे राजकारण : संजय निरूपम