मुंबई नगरी टीम
मुंबई: कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वद्रा यांची गेल्या दोन दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे.यावर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.ज्या दिवशी प्रियांका गांधी यांनी कॉंग्रेस सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारला,त्याच दिवशी त्यांचे पती रॉबर्ट वद्रा यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलवले जाते.हा निश्चितच योगायोग नाही तर मोदी सरकारकडून सत्तेचा गैरवापर आहे,असे निरूपम यांनी म्हटले आहे.
गांधी कुटुंबाला बदनाम करण्यासाठी मोदी सरकारने मुद्दाम हे केले असून भारतीय जनता भाजपनेे नैराश्यामुळे सुरू केलेले सूडाचे राजकारण ओळखून आहे,असे निरूपम यांनी म्हटले आहे.स्वपक्षात विरोधाचा सामना करणाऱ्या निरूपम यांनी रॉबर्ट वद्रा प्रकरणी मोदी सरकारवर थेट हल्ला चढवून पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका यांच्या गुड बुकमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.रॉबर्ट वद्रा यांनी लंडनमध्ये पैशाचा गैरव्यवहार करून मालमत्ता जमवल्याचा आरोप असून प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नेमणूक होताच रॉबर्ट वद्रांची चौकशी कशी होते,असा सवाल कॉंग्रेसमधून विचारला जाऊ लागला आहे.संजय निरूपम यांनीही भाजप सूडाचे राजकारण करत असल्याचा तोच आरोप केला आहे.