मुंबई नगरी टीम
मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवसांचे उपोषण सोडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या उपोषणाची खिल्ली उडवली आहे.अण्णा हजारे यांनी उत्तम अभिनय केला.त्यांचे उपोषण स्क्रिप्टेड होते.२०१४ ते २०१९ या कालावधीत मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली.तेव्हा अण्णा बोलले नाहीत,असा आरोप आव्हाड यांनी करतानाच त्यांना स्क्रिप्ट लिहून दिले,अण्णांनी उत्तम अभिनय केला आणि आपण मूर्खासारखे चर्चा करतो,असे म्हटले आहे.
लोकपाल नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी सहा दिवस उपोषण केले. सातव्या दिवशी त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण सोडले. अनेक नेत्यांनी अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती केली.मात्र आता त्यांनी उपोषण सोडल्यावर आव्हाड यांनी उपोषणाची पटकथा दुसऱ्याच कुणीतरी लिहिली होती,असे म्हटले होते.आव्हाड यांनी म्हटले आहे की,९२/९३ साली अण्णा जसे होते तसेच आजही आहेत.मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ते बोलले नव्हते.आता पाच वर्षांत मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली तेव्हाही अण्णा बोलले नाहीत.त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली आणि त्यांनी उत्तम अभिनय केला. या टीकेवरून अण्णा हजारे भाजपचे एजंट असल्याचा अप्रत्यक्ष आरोप आव्हाड यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही अण्णांवर संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता.तेव्हा ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी अण्णांची माफी मागून ते मलिक यांचे वैयक्तिक मत होते,असे म्हटले होते.आता आव्हाड यांच्या टीकेबाबत पक्ष काय भूमिका घेतो याची उत्सुकता आहे.