मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणूकीची आचारसंहिताच लागण्यापूर्वी भ्रष्टाचार विरहीत आणि गुणवत्तेच्या आधारे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होईल करण्यात येणार असून,शिक्षक भरती मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीच शासनाने पवित्र पोर्टलचे पाऊल उचलले आणि त्याचे सर्व स्तरातून स्वागत झाले आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या एका निवेदनात स्पष्ट केले आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया ही विविध कारणामुळे, शिक्षक भरतीतील माहिती न घेता विविध गैरसमज पसरविण्याचे काम काही ठराविक मंडळी करताना दिसतात. काही माध्यमे एकांगी माहिती घेऊन शासनाची बाजू विचारात न घेता त्या छापतात सुध्दा. शिक्षक भरती पवित्र पोर्टल च्या माध्यमातून करताना संस्थाचालकांनी १:१० असा प्रस्ताव दिला आहे, त्याच्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, पण जे आता जागे झाले आहेत, तीच माणसे संस्थाचालक पवित्र पोर्टलच्या विरोधात नागपूर खंडपीठाकडे गेले होते. त्यावेळी ते गप्प बसले आणि आता शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भरती प्रक्रिया सुरू केली तर युवकांना भडकविण्याचे काम या शक्ती करीत आहेत. मा.उच्च न्यायालयात संस्था चालकांनी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतीला विरोध केल्यावर, त्यावर सरकारने न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडून संस्थाचालकांचा डाव उधळून लावला, त्यात केवळ उच्च न्यायालयाने निर्देश देताना पवित्र पोर्टल मार्फत भरती करताना नियुक्तीचे काही अधिकार संस्थाचालकांना दिले. पण या भरती प्रक्रियेमध्ये शासनाला हातमिळवणी करायची असती तर ही संपूर्ण भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मधून बाहेर काढून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा शासनाने भरल्या असत्या. पण शिक्षक भरती मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीच शासनाने पवित्र पोर्टलचे पाऊल उचलले आणि त्याचे सर्व स्तरातून स्वागत झाले आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या एका निवेदनात स्पष्ट केले आहे.
१:१० हे प्रकरण काय आहे……एका जागेसाठी जर संस्था चालकांना जागा भरावयाची असेल तर पवित्र पोर्टलवर गुणवत्तेवर असलेली पहिली १० नावे संस्था चालकांना पाठविण्यात येतील व त्यामधून गुणवत्तेच्या आधारे १० उमेदवारांची निवड गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्यात येईल. यामध्ये उमेदवारांची मुलाखत आणि वर्गात शिकविण्याचे तास घेऊन, याचे गुणांकन कसे करायचे याचे निर्देश दिले आहेत. मुलाखत व वर्गात घेतलेल्या तासाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग ही करण्यात येईल. या मुलाखती मधून उमेदवारास नाकारल्यास, त्याची लेखी माहिती द्यायला सांगितले आहे. एखाद्या उमेदवार अन्याय झाला असेल तर त्यानुसार शासनाला कार्यवाही करता येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारे करण्याची प्रक्रिया सुरू करूनही ज्यांना मात्र कावीळ झाली आहे, त्यांना सर्व पिवळे दिसत आहे, इतके वर्षे विद्यार्थ्यांची अमाप लूट सुरु असताना, हेच लोक गप्प होते किंबहुना त्यांनी हातमिळवणी केली होती, पण आता मात्र त्यांच्या पोटात दुखत आहे. इतकी पारदर्शक व भ्रष्टाचार निपटून ही शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे, परंतु त्याचे श्रेय राज्य सरकारला मिळू नये यासाठी यासंदर्भात खोटे आरोप करून गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न केला जात आहे. तरीही स्थानिक स्वराज संस्था मध्ये मात्र आता १०० टक्के शिक्षक भरती ही पवित्र गुणवत्तेच्या माध्यमातून १:१ उमेदवार पाठवून केल्या जातील, त्यामुळे आचारसंहितेच्या पूर्वी भ्रष्टाचारविरहित आणि गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती प्रक्रिया महाराष्ट्रात सुरु झाल्याचे दिसेल.