‘तुम्ही संधीचे सोनं कराल’…. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

मुंबई नगरी टीम

मुंबई । भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर विनोद तावडे यांनी आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर कशा पध्दतीने प्रभावी काम करता येईल याबाबत तावडे यांना मार्गदर्शन केले.पक्षाकडून राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अनेक अपेक्षा तुमच्याकडून आहेत,असे मोदी यांनी विनोद तावडे यांना सांगितले.

तुमच्या राजकीय जीवनामध्ये जगातील सर्वात मोठा पक्ष असणा-या भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून मिळालेली जबाबदारी ही एक मोठी संधी असून त्याचं तुम्ही सोनं कराल, असा विश्वास मोदी यांनी तावडे यांच्याशी बोलतांना व्यक्त केला.पंतप्रधानांनी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना तावडे यांना सांगितले की, केवळ निवडणुकांचे राजकारण आपल्याला करायचे नसून ख-या अर्थाने सत्तेची फळं सामान्य,गोरगरीब माणसापर्यंत कशी पोहचवता येतील यासाठी अधिक परिश्रम घेतले पाहिजेत. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनासुध्दा प्रेरित केले पाहिजे.भाजपा सत्तेत उपभोग भोगण्यासाठी नसून सत्ता हे जनसेवेचं साधन म्हणून कसं प्रखरपणे वापरता येईल यासाठी तुमचे कौशल्य पणाला लावा, असेही पंतप्रधानांनी तावडे यांना सांगितले.माझ्या राजकीय आयुष्यातील सर्व अनुभव, कर्तृत्व व कौशल्य पणाला लावून पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेन,असे तावडे यांनी म्हटले.

Previous articleलसीचे दोन डोस आणि कोरोना चाचणी केल्यावरच अधिवेशनाला प्रवेश मिळणार
Next articleखूशखबर : वैद्यकीय शिक्षण विभागात १ हजार ५८४ पदांची भरती