राज्यसभा निवडणूक : भाजपकडून हर्षवर्धन पाटील चित्रा वाघ विनोद तावडेंच्या नावांची चर्चा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत असून,भाजपकडून दोन जागांसाठी माजी मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,हर्षवर्धन पाटील आणि भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नावांची चर्चा आहे.तर केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांना मध्य प्रदेशातून संधी दिली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार असून,येत्या ३१ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटी तारीख आहे.भाजपचे पियुष गोयल,विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे हे निवृत्त झाले आहेत.मात्र भाजपचे बलाबल पाहता त्यांचे दोन उमेदवार विजयी होवू शकतात.त्यामुळे दोन जागांसाठी भाजपकडून माजी मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्या नावांची चर्चा आहे.काँग्रेसमधून भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील यांना राज्यसभेसाठी संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.उपाध्यक्षा चित्रा वाघ किंवा केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्या नावाचा विचार झाल्यास विनोद तावडे यांना हरियाणा मधून राज्यसभेसाठी संधी दिली जावू शकते असेही सूत्रांनी सांगितले.हर्षवर्धन पाटील आणि चित्रा वाघ यांना महाराष्ट्रातून संधी दिली गेल्यास केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेत पाठवले जावू शकते.भाजपच्या दोन उमेदवारांच्या नावावर येत्या दोन दिवसात शिक्कामोर्तब केले जाईल असेही समजते.

Previous articleएक दिवस देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येईल यासाठी प्रयत्न करा
Next article१४ महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या ३१ मे रोजी आरक्षण सोडत