१४ महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या ३१ मे रोजी आरक्षण सोडत

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता ओबीसी आरक्षण वगळता इतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत.त्यानुसार येत्या ३१ मे रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना अंतिम प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर आता निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकीत मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण -डोंबिवली, कोल्हापूर,ठाणे, उल्हासनगर, नाशिक,पुणे, पिंपरी-चिंचवड,सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या १४ महानगरपालिकेच्या आयुक्तांना आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश जारी केले आहेत.त्यानुसार २७ मे रोजी अनुसूचित जाती ( महिला) अनुसूचित जमाती ( महिला) व सर्वसाधारण ( महिला) यांच्या करिता आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यासाठी जाहीर नोटीस काढण्याचे तसेच ३१ मे रोजी सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत.अंतिम प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती ,अनुसूचित जमातीचा उतरता क्रम विचारात घेवून राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षणास मंजूरी देण्यात येत असल्याचेही आदेशात म्हटले आहे.तसेच जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही,तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नसल्याचेही या आदेशात म्हटले आहे.

Previous articleराज्यसभा निवडणूक : भाजपकडून हर्षवर्धन पाटील चित्रा वाघ विनोद तावडेंच्या नावांची चर्चा
Next articleमुख्यमंत्री म्हणतील…दगडाला सोन्याची नाणी,पाईपला नळ आणि नळातून येणा-या हवेला पाणी समजा