मुख्यमंत्री म्हणतील…दगडाला सोन्याची नाणी,पाईपला नळ आणि नळातून येणा-या हवेला पाणी समजा

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद । मुख्यमंत्र्यांना कोणत्याच समस्येशी काही लेनदेन नाही.ते म्हणतील, मी म्हणतो म्हणून औरंगाबादला संभाजीनगर समजा,दगडाला सोन्याची नाणी समजा,पाईपला नळ समजा आणि नळातून येणा-या हवेला पाणी समजा अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

औरंगाबाद येथ भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या जलआक्रोश मोर्चाला संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.शिवसेनेच्या नेतृत्त्वातील भ्रष्ट कारभार संपविण्यासाठी रस्त्यावर आलो आहोत.हा भाजपाचा मोर्चा नाही, तर संभाजीनगरच्या जनतेचा मोर्चा आहे. असेही फडणवीस यांनी यावेळी ठणकावले.आजची लढाई ही सत्ता परिवर्तनाची नाही, तर व्यवस्था परिवर्तनाची आहे.असे सांगून मुख्यमंत्र्यांना कोणत्याच समस्येशी काही लेनदेन नाही. ते म्हणतील, मी म्हणतो म्हणून औरंगाबादला संभाजीनगर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा, पाईपला नळ समजा आणि नळातून येणा-या हवेला पाणी समजा अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यावर प्रहार केला.भाजपच्या या जलआक्रोश मोर्चाच्या सभेचे काही पोस्टर्स फाडण्यात आली.त्यावरूनही त्यांनी शिवसेनेला लक्ष केले.तुम्ही माझ्या सभेचे पोस्टर्स फाडू शकाल,पण जनतेचा आक्रोश तुम्ही मिटवू शकत नाही असेही फडणवीस म्हणाले.आम्ही जेव्हा पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली, तेव्हा महापालिकेने १ रुपया द्यावा, बाकी पूर्ण निधी राज्य सरकार देईल असा निर्णय घेतला पण आता सरकार बदलले आणि ६०० कोटी महापालिकेला द्यायला सांगितले.

आताच्या राज्यकर्त्यांना संभाजीनगरशी काहीच लेनदेन नाही.मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ हे महाराष्ट्राच्या नकाशावर आहे, हेच त्यांना ठावूक नाही असा टोलाही त्यांनी लगावला.या सरकारने वैधानिक विकास मंडळाचा आणि वॉटरग्रीडचा मुडदा पाडला आहे.समुद्रातून वाहून जाणारे पाणी वाचविण्याच्या योजनेला स्थगिती दिली तसेच जलयुक्त शिवार योजना बंद केली असे सांगून हे सरकार पाण्याची शत्रू आहे असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Previous article१४ महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या ३१ मे रोजी आरक्षण सोडत
Next articleसंभाजीराजेंचा पत्ता कट; शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे किंवा उर्मिला मातोंडकरांना संधी !