संभाजीराजेंचा पत्ता कट; शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे किंवा उर्मिला मातोंडकरांना संधी !

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून सोमवारी रात्री उशिरा उमेदवार निश्चित होणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली पक्षप्रवेशाची मुदत आज संपल्याने शिवसेना आपले दोन्ही उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.औरंगाबादचे चंद्रकांत खैरे आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावावर पक्षात विचार होत असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचे पक्षाकडून आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींना पक्षप्रवेशाचे निमंत्रण देण्यात आले होते. पण, संभाजीराजेंनी पक्ष प्रवेशाला नकार दिला. आज दुपारी त्यांनी नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट मध्ये आठवडाभर ठोकलेला तळ संपवला व ते कोल्हापूरला रवाना झाले. आजच संध्याकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून या जागेसंदर्भात निश्चिती होण्याची शक्यता आहेयासंदर्भात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता, ‘आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार आहे. आमचा संभाजीराजेंना विरोध नाही, असे राऊत म्हणाले. मला बाकी काही माहिती नाही पण शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडुन सांगण्यात आले. शिवसेनेने संभाजी छत्रपती यांना उमेदवारीसाठी पक्ष प्रवेशाची अट घातल्याबद्दल भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टिका केली. शिवबंधन घालायला सांगता मग, क्रमांक एकची जागा राजेंना का देत नाही, असा सवाल दानवे यांनी सेनेला केला आहे.संभाजी राजे छत्रपती यांचा विषय शिवसेनेकडून आता संपवलेला आहे. औरंगाबादचे चंद्रकांत खैरे किंवा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावावर पक्षात विचार होत असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

Previous articleमुख्यमंत्री म्हणतील…दगडाला सोन्याची नाणी,पाईपला नळ आणि नळातून येणा-या हवेला पाणी समजा
Next articleउद्धव ठाकरे,अजित पवार,नाना पटोले सांगा ! राज्यात पेट्रोल डिझेलची महागाई कोणामुळे आहे ?