एकनाथ शिंदे शिवसेनेचे १५ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते ! चंद्रकांत खैरेंचा दावा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात शिवसेना भाजपचे सरकार सत्तेवर असताना भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता.शिवसेनेच्या या शिष्टमंडळात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला असतानाच,शिवसेनेच्या १५ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अनैसर्गिक युती केल्याने बंडाचा निर्णय घेतला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात आहे.मात्र आज काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गौप्यस्फोट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.२०१४ मध्ये राज्यात भाजप शिवसेनेचे युती सरकार असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव घेवून शिवसेनेचे एक शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते विशेष म्हणजे या शिष्टमंडळात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते,असा दावा अशोक चव्हाण केल्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही एक गौप्यस्फोट केला आहे.पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे शिवसेनेचे १५ आमदार घेवून काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला आहे.एकनाथ शिंदे यांच्या या प्रकाराचा सुगावा शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना समजला त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेही खैरे यांनी स्पष्ट केले.आज गद्दारी करणारे एकनाथ शिंदे स्वत: काँग्रेससोबत जाणार होते त्याचे काय असा सवाल करीत शिंदे यांनी देवीच्या साक्षीने खरे सांगावे असेही खैरे म्हणाले.

Previous articleगॅस सिलेंडर वापरावर मर्यादा घातल्याने सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर निशाणा
Next articleउद्धव ठाकरेंची खेळी मंत्री संजय राठोड चिंतेत; बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज शिवसेनेत