मुंबई नगरी टीम
मुंबई: अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशनासाठी राज्यातील 28 जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 2200 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ३०० रुग्णांवर स्मृतीभ्रंशाचे उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
देशभरात अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात ४.१ दशलक्ष रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत. जीवनकालावधी वाढत असल्याने या आजाराच्या रुग्णआंची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्लिनिक सुरु करून त्या माध्यमातून अल्झायमर विषयी ‘अर्ली डिटेक्शन सेंटर’ सुरु झाले आहे. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. स्मरणशक्ती विषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केल्यानंतर रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतो.
स्मृतीभ्रंश आजारावर वेळीच औषधोपचारासाठी मेमरी क्लीनिक सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसिक आजारासंबंधी तपासणी रोज केली जाते मात्र स्मृतिभ्रंश संबंधी आजाराच्या रुग्णांची आठवड्यातून दोन दिवस तपासणी केली जाते. आतापर्यंत रायगड, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, नाशिक, सिंधुदूर्ग, वर्धा, नंदूरबार, सातारा, चंद्रपूर, पुणे, ठाणे, नागपरू, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, औरंगाबाद, जालना, पिंगोली, लतूर, बीड, नांदेड, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामंध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
डिसेंबर अखेरपर्यंत २२०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ३०० रुग्णांना स्मृतीभ्रंशांचे निदान करण्यात आले असून मेमरी क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना मार्गदर्शन व औषधोपचार केले जातात. त्याचबरोबर शारीरीक व मानसिक व्यायाम आणि विविध खेळ देखील त्यांना शिकविले जातात. विशेष म्हणजे स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यायची याविषयी त्यांच्या नातेवाईकांना मेमरी क्लिनिकच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येते असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.