भाजप आणि शिवसेना यांची युती मातोश्रीच्या स्वार्थासाठी

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांची युती केवळ वैयक्तिक आणि मातोश्रीच्या स्वार्थासाठी झाली आहे.युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार नाही कारण मने जुळलेली नाहीत,असा हल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज चढवला.

राणे म्हणाले की,युतीनंतरही कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.युतीत कुठे उत्साह नव्हता आणि समाधान नव्हते.युती झाल्यावर कार्यकर्ते आपापल्या घरी निघून गेले. तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना अशी ही युती असून अनेक कारवायांपासून वाचण्यासाठी युती आहे,अशी जोरदार टीका राणे यांनी केली.शिवसेनेवर हल्ला चढवताना राणे यांनी देशातील सर्वाधिक भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत असल्याचा आरोप केला. भ्रष्टाचार पचवण्यासाठी युती केली असल्याचे ते म्हणाले.

राणे यांनी आपण राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही,असे सांगितले. मी भाजपचे सदस्यत्व घेतलेले नाही. जाहीरनामा समितीत त्यांनी मला ठेवावे किंवा वगळावे.मी माझ्या पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा काढणार नाही. एकाच वेळी मी दोन पक्षांचा जाहीरनामा कसा काढेन,असा सवाल त्यांनी केला.मी खासदारकीचा राजीनामा देणार नाही आणि आघाडीतही जाणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.

इतरही अनेक मुद्यावर राणे यांनी उत्तरे दिली. माझा प्रहार शिवसेना आणि आघाडीवर नसेल,असे सांगून त्यांनी भाजपचा दरवाजा उघडा ठेवला असल्याचे बोलले जाते.तसेच शिवसेना हा टक्केवारीवर चालणारा पक्ष आहे,असा आरोप त्यांनी केला. युती होणार नाही असे सांगणारे संजय राऊत आता कुठे आहेत,असा सवाल त्यांनी केला.

Previous articleजेव्हा…मंत्री पंकजा मुंडेंच्या आवाहानाला मोठा प्रतिसाद मिळतो
Next article५५७ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्च रोजी मतदान