राज ठाकरे पुढील आठवड्यात निर्णय घेणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजूनही लोकसभा निवडणुकीत उतरणार का आणि आघाडीत जाणार का,याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यांची भेट घेतल्यावर राज ठाकरे आघाडीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण राज ठाकरे यांनी निर्णय जाहीर केला नाही. पुढील आठवड्यात राज ठाकरे पुणे आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर जात आहेत. तेथून परतल्यावर आघाडीत जायचे की नाही,याबाबत निर्णय जाहीर करतील,अशी अपेक्षा आहे.
राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे. त्यासाठी अजित पवार यांनी खास त्यांची भेट घेतली होती.मात्र त्या भेटीत काय झाले,हे अजूनही बाहेर आले नाही. त्यामुळे राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात,याबद्दल उत्सुकता आहेच.मात्र मनसे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.निवडणुकीत उतरायचे की नाही,याबाबत मनसे पक्षात संभ्रम आहे.
मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे,असे सांगत अजित पवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.राज ठाकरे यांनी मुंबईसह नाशिक आणि ठाणे या जागांची मागणी केल्याचे बोलले जाते. मात्र काँग्रेस राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासाठी अनुकूल नसल्याने निर्णय लटकला आहे. तरीही अजित पवार यांनी काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा होती.मनसेसाठी राष्ट्रवादीनेच अगोदर फिल्डिंग लावली होती.ईशान्य मुंबईची जागा मनसेला देऊन त्याबदल्यात अन्यत्र त्यांची मदत घ्यावी,असा प्रस्ताव राष्ट्रवादीने ठेवला होता. पण काँग्रेसने तो धुडकावून लावला.