धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार  जाहीर

धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार  जाहीर

मुंबई नगरी टीम

नाशिक : नाशिकच्या सार्वजनिक वाचलनालयातर्फे (सावाना) देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जाहीर झाला आहे. येत्या ४ मार्च रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहीती वाचलनालयाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी दिली.

माजी आमदार व पत्रकार (कै.माधवराव लिमये) यांच्या स्मृतीनिमित्त मागील १६ वर्षांपासून दिल्या जाणार्‍या या पुरस्कारासाठी या वर्षी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. या पुर्वी हा पुरस्कार बी.टी.देशमुख, गणपतराव देशमुख, आर.आर.पाटील, शोभाताई फडणवीस, जीवा पांडु गावित, दत्ताजी नलावडे, गिरीष बापट, सा.रे.पाटील, पांडुरंग फुंडकर, जयवंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चु कडु, निलम गोर्‍हे, गिरीष महाजन यांना देण्यात आला आहे. ५० हजार रूपये रोख , स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, कै.लिमये यांच्या कन्या सौ.शोभाताई नेर्लीकर,  डॉ.विनायक नेर्लीकर यांच्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. आ.हेमंत टकले, ज्येष्ट पत्रकार शैलेंद्र तनपुरे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, डॉ.नेर्लीकर दांम्पत्य यांच्या निवड समितीने मुंडे यांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली. ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे हे मागील ८ वर्षांपासून विधान परिषदेचे सदस्य म्हणुन काम पाहत आहेत, साडेचार वर्षांपासून  विरोधी पक्षनेते म्हणुन काम करताना त्यांनी सभागृहात शेतकरी, युवक, बेरोजगार, महिला, कष्टकरी व सामान्य नागरीकांच्या प्रश्‍नांवर विविध आयुधांच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम केले आहे. राज्यातील १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरणे सभागृहात पुराव्यानिशी मांडुन त्यांनी एक वेगळी छाप सभागृहात पाडली. एक अतिशय आक्रमक, अभ्यासु आमदार म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून, त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणुन यापुर्वी दै.लोकमतने त्यांचा पॉवरफुल राजकारणी म्हणुन तसेच दैनिक लोकमतच्या वतीने विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासु वक्ता म्हणुन पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

Previous articleपाण्याचा एक थेंबही गुजरातला देवू देणार नाही : छगन भुजबळ
Next articleमेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब दोडतले