पाण्याचा एक थेंबही गुजरातला देवू देणार नाही : छगन भुजबळ

पाण्याचा एक थेंबही गुजरातला देवू देणार नाही : छगन भुजबळ

मुंबई नगरी टीम

नाशिक :  महाराष्ट्र आणि गुजरातच्या पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय जलसंसाधन मंत्र्यांना पत्र देऊन एमओयु चा ड्राफ्ट पाठवला त्यानुसार ४३४ एमसीएम पाणी गुजरातला देण्यास तयार आहोत अशी सहमती दर्शविली त्याबदल्यात तापी खोऱ्यातून ४३४ एमसीएम पाणी महाराष्ट्राला देऊ ही धूळफेक आहे. तर महाराष्ट्राच्या जमिनीवर पडणारा पाण्याचा एक थेंबही गुजरातला देवू देणार नाही. तर सत्तेत आल्यावर सरकारने केलेला एमओयु फाडून टाकू असा इशारा छगन भुजबळ यांनी सरकारला दिला आहे. किसान सभेच्या वतीने आयोजित लॉंग मार्च मधील कष्टकरी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मोर्चात विल्होळीपर्यंत चालत गेले.

 भुजबळ म्हणाले की, गेल्या वर्षभरापूर्वी निघालेल्या शांततामय मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांचे पाय अक्षरशः रक्तबंबाळ झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कालबद्ध रितीने या मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. मात्र मागण्या पूर्णपणे मान्य न झाल्याने कष्टकरी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या मागण्या घेऊन मुंबईच्या दिशेने निघावे लागले. अनेक शेतकऱ्यांच्या वनजमीनीचे पट्टे अद्याप दिले गेले नाही. याबात विधान सभेत प्रश्न उपस्थित केला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सोबत माझी खडाजंगी झाली होती.राज्य शासनाने ‘दमणगंगा-पिंजाळ’ व ‘पार-तापी-नर्मदा’ या नदीजोड प्रकल्पाच्या प्रारूप सामंजस्य कराराची  प्रत केंद्र शासनाला पाठविली आहे. सदर सामंजस्य करार विधानसभेच्या पटलावर ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प अहवाल तयार नसतांनाही गुजरात बरोबर जलकरार करण्याची घाई केली जात आहे. ‘दमणगंगा-पिंजाळ’ या नदीजोड प्रकल्पाचा डी.पी.आर तयार झाला आहे. सदर  प्रकल्पामध्ये सुधारणा करून दमणगंगा (एकदरे)-गोदावरी लिंक ५ टी.एम.सी आणि दमणगंगा(वाल-वाघ)-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक ७ टी.एम.सी या दोन प्रकल्पांचे डी.पी.आर तयार केले जात असून हे दोन नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्पाचा भाग म्हणून घेण्याची आमची मागणी आहे.

 पार-तापी-नर्मदा या नदीजोड प्रकल्पामध्ये सुधारणा करून  ‘नार-पार-गिरणा’ १२.८ टी.एम.सी चा डी.पी.आर केला जात आहे. मात्र तो अद्याप तयार नाही त्याचबरोबर आणि ‘पार-उनंदा(पुणेगांव)-गोदावरी लिंक’ चा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पामध्ये सामावेश होण्यासाठी या प्रकल्पाचा अहवालसुद्धा तातडीने करण्याची आवश्यकता आहे. मात्र तो अहवाल गोदावरी पाटबंधारे महामंडळामार्फत करण्यात येत आहे. दमणगंगा आणि नार-पार खोऱ्यातील महाराष्ट्राच्या  पाणलोट क्षेत्रातील संपूर्ण पाणी गिरणा-गोदावरी खोऱ्यात वळवणाऱ्या नदीजोड प्रकल्पांचे डी.पी.आर प्रथम केले जावे मगच केंद्र शासन आणि गुजरात सरकारबरोबर सामंजस्य करार करावा. तज्ञ समितीच्या अहवालानुसार  नार-पार-औरंगा-अंबिका खोऱ्यामध्ये ३७ टी.एम.सी.पाणी उपलब्ध आहे. नार-पार-गिरणा उपसा जोड योजनेद्वारे ३६२.६२ दलघमी(१२.८० टीएमसी) पाणी गिरणा उपखोऱ्यात वळवले जाईल. उर्वरीत २४.२० टीएमसी पाणी पार-तापी-नर्मदा  या राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाद्वारे गुजरातमध्ये वापरण्याचे नियोजन असल्याचे पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाच्या सविस्तर अहवालावरून स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केवळ ३०० मीटर उंचीपर्यंतच्या नदी जोड योजना आर्थिक व्यवहार्यतेच्या निकषात बसत नाही म्हणून राज्याच्या पाण्यावरचा हक्क सोडण्यात येवू नये. महाराष्ट्रातील दमणगंगा व नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील संपूर्ण पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क अबाधित राहण्यासाठी पार-तापी-नर्मदा या नदीजोड प्रकल्पास महाराष्ट्राची असहमती असल्याबाबत कळवून या प्रकल्पाबाबत गुजरात सरकार व केंद्र शासनाशी कोणताही करार करू नये.

दमणगंगा व नार-पार या दोन्ही खोऱ्यांच्या जलनियोजनासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्य अभियंता जलविज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य अभियंता कोकण,मुख्य अभियंता एनएमआर या तज्ञांची समिती नेमली होती. या समितीने शासनास “दमणगंगा-नार-पार खोऱ्यातील संपूर्ण पाणी महाराष्ट्रास वापरणे शक्य आहे” अशी शिफारस केली आहे तसेच  ‘महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला दिल्यास  महाराष्ट्रातील तुटीच्या गिरणा व गोदावरी खोऱ्यातील प्रस्तावित योजनांवर परिणाम होवून काही नियोजित प्रकल्प रद्द करावे लागतील” अशी शिफारस केलेली आहे. तज्ञ समितीच्या शिफारशी विचारात घेणेही आवश्यक आहे. सध्याच्या शासन निर्णयाचे अवलोकन केले असता  तज्ञ समितीच्या शिफारशी डावलून नार-पार खोऱ्यातील उर्वरित पाणी गुजरातच्या हितासाठी  लिंकला देण्याचे नियोजन दिसते. त्याबदल्यात तापी खोऱ्यात पाणी देण्यात येईल असे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

ते म्हणाले की, फडणवीस सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा. अन्यथा फसवणूक करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची फसवणूक केल्याशिवाय जनता गप्प बसणार नसून तुमचे सिंहासन हलविल्याशिवाय राहणार नाही.  शरद पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली. मात्र फडणवीस सरकारने निकषांच्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली आहे. सरकारने गोर गरीब जनतेचे शाप न घेता जाता जाता चांगले काम करून जा असा चिमटा देखील भुजबळ यांनी यावेळी काढला. तसेच आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आंदोलकांच्या सोबत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Previous article..असे म्हणताना यांची जीभ कशी झडत नाही : अजित पवार
Next articleधनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार  जाहीर