छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते वेळेआधीच मुख्यमंत्री झाले असते

मुंबई नगरी टीम

मुंबई । छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते वेळेआधीच मुख्यमंत्री झाले असते,असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.सध्या प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागत आहे.मैदानासाठीही न्यायालयात जावे लागत आहे असे सांगून,हिंमत असेल मैदानात या, माझी तयारी आहे.मी मैदानात उतरलो आहे.आम्हाला मैदान कसे मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचे ते होऊन जाऊ दे असे आव्हानही त्यांनी यावेळी शिंदे गटाला दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत शिंदे गटावर हल्लाबोल केला.छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते वेळेआधीच मुख्यमंत्री झाले असते, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. १९९९ मध्ये आणखी चार महीने मिळाले असते तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असे आपल्या भाषणात विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले त्याचाच धागा पकड उद्धव ठाकरे म्हणाले की, दादा तुम्ही हे मला अगोदरच सांगितले असते तर मी पण त्यांना कामाला लावून दिले असते,भुजबळ तुम्ही शिवसेना सोडल्यानंतर पहिला आणि मोठा मानसिक धक्का आम्हा कटुंबियांना बसला होता.माँ, बाळासाहेब यांना धक्का बसला होता.आपल्या कुटुंबातील माणूस आपल्याला सोडून जाऊ कसा शकतो ? हाच मोठा धक्का होता.राग वगैरे तो राजकारणाचा वेगळा भाग होता.पण आपला माणूस हा जाऊ शकतो हा एक मोठा धक्का होता. त्यातून मानसिकरित्या सावरायला आम्हाला थोडा वेळ लागला”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या.पण भुजबळ परत आले तर सोबत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत काँग्रेसलाही घेऊन आले, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

भुजबळांनी बाळासाहेब असतानाच या सर्व गोष्टी मिटवून टाकल्या.भुजबळ जेव्हा घरी आले तेव्हा बाळासाहेबांनी स्वागत केले. वैरभाव हा खूप टोकाचा शब्द झाला. पण मतभेद होते ते मिटवून टाकले ते फार चांगले झाले. पण त्यावेळी माँ असते तर आणखी चांगले झाले असते अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली.यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.सध्या प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावे लागते. हिंमत असेल तर मैदानात या,माझी तयारी आहे असे आव्हानही ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले.भुजबळ आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत पराभवाला सामोरे गेल्यानंतरही आज जिद्दीने उभे आहेत.बेळगावमधील फोटो कोणी पाहिला तर माझ्यावर पुन्हा एकदा हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप होईल, असेही ठाकरे म्हणाले.

Previous articleराज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याचा घाट ! कार्यवाही थांबवण्याची नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleबाळासाहेबांनी मला झोपडपट्टीतून पुढे आणत मुंबईचे महापौर केले