राज्यातील ४५१८ गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू
मुंबई नगरी टीम
मुंबई : खरीप हंगाम २०१८ मध्ये राज्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ऊर्वरित ४५१८ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या गावांमध्ये दुष्काळ उपाय योजनांच्या आठ सवलती देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. यासंबंधीचा शासन निर्णय आज लागू करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्राच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेवून राज्यातील १५१ तालुक्यामध्ये यापूर्वीच दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमानाच्या ७५० मी.मी. पेक्षा कमी झाला आहे,अशा २६८ महसुली मंडळामध्येही राज्य शासनाने यापूर्वीच दुष्काळ घोषित केला आहे. तसेच विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले अहवाल विचारात घेऊन जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५० मी.मी. पेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या महसुली मंडळातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या गावांमध्येही आठ उपाय योजना राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
वरील यादीत न आलेल्या परंतु जनतेची व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन अंतिम पैसेवारी ५० पैसापेक्षा कमी असलेल्या व अद्याप दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित न केलेल्या ४५१८ गावांमध्येही राज्य शासनाने दुष्काळी उपाय योजनांच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर झालेल्या गावांमध्ये जमीन महसुलातून सूट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५. टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
आज जाहीर झालेल्या जिल्हानिहाय गावांची संख्या पुढील प्रमाणे (कंसात गावांची संख्या) – धुळे (५० गावे), नंदूरबार (१९५ गावे), अहमदनगर (९१),नांदेड (५४९), लातूर (१५९), पालघर (२०३), पुणे (८८), सांगली (३३), अमरावती (७३१), अकोला (२६१), बुलडाणा (१८), यवतमाळ (७५१), वर्धा (५३६), भंडारा (१२९), गोंदिया (१३), चंद्रपूर (५०३),गडचिरोली (२०८).