तलाठी संवर्गातील १८०० पदांची जाहिरात लवकरच

तलाठी संवर्गातील १८०० पदाची जाहिरात लवकरच

मुंबई नगरी टीम

मुंबई : तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात सुमारे १८०९ पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे तलाठ्यांना प्रवास भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या  विविध मागण्यांसदर्भात महसूल मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,मुद्रांक महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम, संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, उपाध्यक्ष गौस महमंद लांडगे,नाशिक जिल्हा अध्यक्ष निळकंठ उगले, समन्वय महासंघाचे सदस्य तानाजी सावंत आदी उपस्थित होते.

सातबारा संगणकिकरण मोहिमेत राज्यातील तलाठ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे तलाठ्यांना प्रोत्साहन म्हणून किमान एक वेतनवाढ मिळावी, अशी मागणी महासंघाच्यावतीने करण्यात आली. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.  तलाठी कार्यालये भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. अशा कार्यालयाना भाडे रक्कम देण्यासंदर्भात महसूल विभागाने प्रक्रिया सुरू केली असून नागपूर विभागासाठी २ कोटी व अमरावती विभागासाठी ५ कोटी १३ लाख रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. तर ऊर्वरित विभागासाठी लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. तसेच मंडल अधिकाऱ्यांसाठी सज्जास्तरावरील तलाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी यांनी तयार करून पाठविण्याचे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.

पाटील म्हणाले, राज्यातील ८० टक्के तलाठींना लॅपटॉप देण्यात आले आहेत. उर्वरित तलाठींना लवकरच लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे. मंडल अधिकारी, अव्वल कारकून यांची अदलाबदलीने पदे भरण्यासंदर्भातील शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात येईल. तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षणासाठी धोरण तयार करण्यात येईल व त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

Previous articleराज्यातील ४५१८ गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू
Next articleशरद पवारांनी केली माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा