ठाणे लोकसभेची जागा मेरिटनुसार भाजपला द्या

ठाणे लोकसभेची जागा मेरिटनुसार भाजपला द्या

मुंबई नगरी टीम

ठाणे : भाजप आणि शिवसेना यांची युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर संघर्ष उफाळून आला आहे. भाजपच्या ठाण्यातील २३ नगरसेवकांनी ठाणे लोकसभा जागा भाजपला मेरिटनुसार मिळावी,असे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिले आहे.

यामुळे शिवसेना कंपूत घबराट उडाली असून ही जागा भाजपला मिळाली नाही तर शिवसेना उमेदवाराचे काम न करण्याचा इशारा दिला आहे.राज्यात युती असल्याने मैत्रीचे वातावरण असले तरीही स्थानिक पातळीवर बदला घेण्याची भाषा सुरू आहे. आता ठाण्यात २३ नगरसेवकांनी बंड पुकारले असल्याने शिवसेना हादरली आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन्ही सदन मिळून पाच आमदार आहेत. शिवसेनेचे फक्त एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक तसेच विधान परिषदेत रवींद्र फाटक असे तीन आमदार आहेत. त्यामुळे मेरिटनुसार भाजपला ही जागा मिळाली पाहिजे,असे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात खासदार राजन विचारे यांच्याविरोधात अनेक तक्रारी केल्या आहेत. भाजप आमदारांच्या कामांत त्यांनी अडचणी निर्माण केल्या. त्यांचे वर्तन उद्धटपणाचे असल्याने त्यांना उमेदवारी दिली तरीही त्यांचे काम करणार नाही,असा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.ठाण्यात शिवसेना उमेदवार दिला तर विचारे यांच्याशिवाय दुसरा कुणीही द्यावा,असे त्यांनी म्हटले आहे.असाच असंतोष श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आहे. त्यांनी कळवा आणि मुंब्रा परिसराकडे दुर्लक्ष केले असल्याने त्यांचे काम का करायचे,असे म्हटले आहे. हा संघर्ष दूर करण्याचे मोठे आव्हान आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आहे.

Previous articleभाजप शिवसेनेने रासपला पाच जागा सोडाव्यात
Next articleआमच्यासोबत यायचे की नाही ते काँग्रेसने ठरवावे