रूग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील १००० मृत्यू का दडवले ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : रूग्णालयाबाहेर झालेले पण विविध प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे १००० मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत. आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या एका पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मुंबईत ज्या रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान १००० मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही. प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान ४५० मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर ७२ तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे.

मुळात कोरोनाविरूद्धच्या लढाईत कोणत्या आठवड्यात किती मृत्यू झाले, किती रूग्णसंख्या आढळली, म्हणजे संसर्ग (इन्फेक्शन) किती प्रमाणात झाले आहे, हे कळण्यासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. अचूक विश्लेषणाचा तो महत्त्वपूर्ण आधार आहे. या विश्लेषणातूनच आणि रणनीती आखून त्याला पायबंद घालणे शक्य आहे. त्यामुळे नोंदी अचूक ठेवण्याचा आग्रह सातत्याने असला पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, ही विलंबाची पद्धत बंद करून अचूक आकडेवारी हाती येईल आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्यादिशेने योग्य त्या सूचना आपण संबंधितांना द्याल, हा विश्वास वाटतो, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

असेच एक पत्र यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना १५ जून रोजी पाठविले होते. सुमारे ९५० मृत्यू कोरोनामुळे झालेले असताना सुद्धा ते त्यावेळी दाखविण्यात आलेले नव्हते. त्यानंतर १६ जून रोजी मुंबईत 868 आणि मुंबईसह राज्यात एकूण १३२८ मृत्यू अधिकचे दाखविण्यात आले. मुंबईत या ८६८ च्या व्यतिरिक्त सुमारे ३५० जुने मृत्यू दरम्यानच्या काळात अधिक करण्यात आले. (जे प्रारंभी अपात्र ठरविण्यात आले, मात्र अपात्र ठरू शकत नाहीत, असे लक्षात आल्यावर ते दाखविण्यात आले.) म्हणजेच असे एकूण १२०० हून अधिक मृत्यू एकट्या मुंबईतील जुने परंतू नंतर दाखविण्यात आले आहेत. अशाच प्रकारात मोडणारी ही दुसरी बाब आहे.

Previous articleमुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न
Next articleसलून,केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरु करताना पाळावे लागतील “हे” नियम