राज ठाकरे,उद्धव ठाकरे,देवेंद्र फडणवीस आणि मविआच्या सभांचा महाराष्ट्रात धुरळा !

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभेनंतर भोंग्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच ३० एप्रिलला पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा होणार आहे.त्यांनतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद मध्ये तर त्याच दिवशी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.मनसे आणि विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी १४ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.एकूण येत्या काही दिवसात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरात झडण्याची शक्यता आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मैदानात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वावरून निशाणा साधला होता. तर ठाण्यात झालेल्या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्यावरून राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबाद येत्या १ मे राजी होत आहे. राज ठाकरे यांच्या सभामधून शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची उपलब्धी आणि विरोधकांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून येत्या ३० एप्रिलला पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेत महाविकास आघाडीचे नेते विरोधकांना आणि विशेषत: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यात सध्या भाजप विरूद्ध महाविकास आघाडी सरकार असा समाना रंगला आहे.शिवसेना आणि भाजपात हिंदुत्वावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर हुनमान चालीसा पठण यावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर झालेली कारवाई आणि भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांची येत्या १ मे रोजी मुंबईत जाहीर सभा होत आहे. भाजपकडून यासभेचा उल्लेख ” बुस्टर डोस” सभा असा करण्यात आला असल्याने यासभेत फडणवीसांकडून महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या सभांनतर येत्या १४ मे रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून मनसे,भाजपकडून केल्या जाणा-या आरोपांच्या पार्श्वभूमीवर येत्या ३० एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिवसेनेच्या पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्व आणि मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सेनेला लक्ष्य केले आहे.त्याला १४ मे रोजी मुंबईत होणा-या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर देण्याची शक्यता आहे.सध्या निवडणुकांचा हंगामा नसला तरी मशिदीवरील भोंगे आणि हिंदुत्वावरून विरोधकांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असतानाच विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी आणि शिवसेना सज्ज झाल्याने येत्या काही दिवसांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची जास्त शक्यता आहे.

Previous articleउत्तर प्रदेशात इतके वर्ष भोंगे चालत होते,मग ते काढण्यास भाजपला कुणी थांबवले होते ?
Next articleवाचा : ठाकरे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे ९ निर्णय