मोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली ;शिवसेनेकडून प्रशंसा
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय हवाई दलाने ताबा रेषा ओलांडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ बॉंब टाकून उध्वस्त केल्यानंतर आज प्रथमच शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली,असे ते म्हणाले. यापूर्वी शिवसेनेने ५६ इंची छातीच्या संदर्भात अनेकदा भाजप आणि मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.
सावंत म्हणाले की,आपण घरात घुसून मारले आहे. आपल्या सेनेचा खूप अभिमान आहे. पंतप्रधानांनी ५६इंची छाती दाखवून दिली आहे,अशा शब्दांत सावंत यांनी कौतुक केले आहे. आज पहाटे भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल हल्ल्यात पाकमधील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले आणि या हल्ल्यात दोनशे दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येते.
यापूर्वी शिवसेनेने नेहमीच भारतीय जवानांवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ले केले की पंतप्रधान मोदी यांच्या ५६ इंची छातीचा उल्लेख करून उपरोधिक टीका केली जायची.आता युती झाल्यावर सारे संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे शिवसेनेने मोदींचे कौतुक केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजपला मैत्री कशी असते ते दाखवून देऊ,असे म्हटले होते. त्या अनुषंगाने सावंत यांनी मोदी यांची प्रशंसा केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सर्जिकल हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मसूद अझरला ठार मारल्याशिवाय भारताचा बदला पूर्ण होणार नाही,असे म्हटले आहे.भारताच्या फायटर विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमधील अतिरेकी तळांवर हल्ला केल्याबद्दल त्यांनी वायुसेनेचे अभिनंदन केले आहे.मात्र जैशचा सैतान मसूद अझरला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही,असे राऊत यांनी म्हटले आहे.