शिवसेनेला  धक्का ; उपनेते डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेनेला  धक्का ;  उपनेते डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना उपनेते आणि छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेनाला मोठा धक्का असल्याचे मानले जाते.आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची  शक्यता आहे.

शिवसेनेचे उपनेते आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.  औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे  नेते आ. छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी उपस्थित होते.

अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश का करत आहे परंतु आज देशाच्या राजकारणात फार मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे. ही जाणीव शरद पवार यांच्या सारख्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करावे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे अशी स्पष्ट भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत काम करायला मिळाले त्याचा आता आनंद होत आहे. लहानपणी शरद पवार यांची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडीमागे मी धावत होतो. परंतु आज त्यांच्याच पक्षाचे काम करायला मिळत आहे. यापुढे पक्षाचे काम अखंडपणे सुरु राहणार आहे असे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  छगन भुजबळ यांनी म्हणाले की,  डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी कसे होते हे मांडले आहे. ते सुशिक्षित आहेत. त्यांचा नक्कीच निवडणुकीत फायदा होणार आहे . डॉ. कोल्हे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला फार मोठा फायदा होणार असल्याचेही भुजबळ या वेळी  म्हणाले. पक्षात नवे आहोत अशी वागणूक त्यांना देणार नाही. शरद पवार यांचे त्यांना मार्गदर्शन आहे आणि ते खंबीरपणे पाठीशी उभे आहेत असेही  भुजबळ यांनी स्पष्ट केले.  जगाच्या पाठीवर प्रतिभावंत कलेवर प्रेम करत राजा शिवछत्रपती साकारला आणि आता राज्यातील घराघरात गाजत असलेली स्वराज्य रक्षक संभाजींचा स्वाभिमानी इतिहास उभा करणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा त्याग करुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे  प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानीच ही भेट झाली होती. त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते. या दोघांनीही पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात पोहचले आहेत. २०१४ मध्ये  त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते.

 

Previous articleमुंबई पोलीसांच्या ताफ्यात ३० “घोडेस्वार पोलीस”
Next articleविजयसिंह मोहिते पाटलांना राज्यसभेवर पाठविणार : पवार