महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकांसोबत महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुक होणार असून, त्यासंदर्भात विधानसभा बरखास्त करण्याचा महत्वपूर्ण  निर्णय आज रात्री घेण्यात येईल अशी चर्चा आज राजकीय वर्तुळात आहे. यावरुन अनेक तर्कवितर्कही लढवले असतानाच, हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या, अशा शब्दांत त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी  मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये होते तर उद्या म्हणजेच शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची चर्चा असतानाच लोकसभेसोबत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याची जोरदार चर्चा आज राजकीय वर्तुळात चर्चीली जात होती. त्यात काहींनी समाजमाध्यांमांवरून याची शक्यता वर्तविल्याने अशा चर्चेला बळ मिळाले. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री दिल्लीत होणाऱ्या उच्चस्तरीय समितीकडून घेतला जाईल, अशी जोरदार चर्चा आज सकाळपासून सुरू होती. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होणार का, याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. ही चर्चा संपूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले.

गेल्या दोन दिवसामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. गेल्या मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाने खुश करणारे अनेक निर्णय घेतले आहे. राज्याच्या विविध विभागात   सरकारकडून उद्धाटने आणि भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणुका होणार असल्याचा  दावा गेल्या महिन्यातच  केला होता.विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, असे चव्हाण म्हणाले होते.

Previous articleपंकजा मुंडेंच्या महिला व बालविकास  विभागात १०६ कोटी रुपयांचा मोबाईल घोटाळा
Next articleभाजपसह १४  राजकीय पक्षांना  निवडणूक आयोगाची नोटीस