‘हे’ आपल्याला माहित होते,राऊत- फडणवीसांच्या भेटीवर शरद पवारांचा गौप्यस्फोट   

मुंबई नगरी टीम

पंढरपूर : शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एक भेट काय झाली आणि राजकीय धुराळा उडायला लागला. राजकीय वर्तुळात चर्चिल्या जाणाऱ्या या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे.तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याचे देखील त्यांनी खंडन केले आहे.

शरद पवारांनी आज मंगळवारी पंढरपुरात दौरा केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राकारणात अशा भेटीगाठी होतच असतात. माझी मुलाखत घेतल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या देखील मुलाखत घेणार असल्याचे यापूर्वीच सांगितले होते.त्यामुळे यात राजकरण नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी करत या प्रकरणावर अखेर पडदा पाडला आहे. राज्यात मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती आहे या वक्तव्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. सरकारला कोणताही धोका नाही.सरकार पाच वर्षे टिकेल, असे म्हणत शरद पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे खंडन केले आहे.

या भेटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनाला भाजप आणि रिपाईसोबत राज्यात सरकार स्थापन करण्याची साद घातली होती. तर शिवसेनेने पुढाकार न घेतल्यास शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे असा प्रस्ताव आठवले यांनी मांडला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, रामदास आठवले यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. रामदास आठवले यांचा एक  आमदार, खासदार तरी आहे का?, अशा शब्दांत शरद पवारांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.

दरम्यान, देशभरात तापलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना शरद पवारांनी तपास यंत्रणेसह विरोधकांना यावेळी टोला लगावला आहे. “या प्रकरणात सुशांतच्या मृत्यूचे कारण राहिले बाजूला पण इतर गोष्टीच समोर येत आहेत. त्यामुळे यावरून लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जात असल्याची शंका उपस्थित होत आहे. एका अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. परंतु केंद्र सरकारला मुंबई पोलिसांवर विश्वास नसावा म्हणून त्यांनी सीबीआयची यंत्रणा नेमली. पण सीबीआयने आतपर्यंत काय दिवे लावले, ते दिसत नाही, आम्हाला काही प्रकाश बघायला मिळत नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

Previous articleमध्यावधी निवडणूका घ्यायच्या असतील तर राजभवनात जाऊन भेटा
Next articleकोरोना संकटात बेरोजगारांना मोठा दिलासा ; ५३ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार