अजित पवारांकडून अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
मुंबई नगरी टीम
पुणेः शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका केल्याने प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले अभिनेते अमोल कोल्हे यांना देणार असल्यावर ज्येष्ठ नेते अजित पवारांनी आज अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले.
पवार म्हणाले की,तुम्हाला हवा तोच उमेदवार आम्ही देणार आहोत. शिरूर मतदारसंघातील जनतेची पसंती शरद पवार साहेबांना कळविली जाईल आणि साहेब अंतिम निर्णय घेतील. पण तुम्ही ज्यांना टीव्हीत पाहता त्यांना नुसते पाहू नका तरत्यांच्या नावासमोरील बटण दाबा,असे पवार म्हणाले. शिरूर तालुक्यातील एका संवादयात्रा कार्यक्रमात ते बोलत होते.
पवारांनी सुरूवातीला मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला.भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी संभाव्य उमेदवारांची नावे घेतली. विलास लांडे यांचे नाव घेतल्यावर ठराविक लोकांनी हात वर केले.पोपटराव गावडे,सूर्यकांत पलांडे, देवदत्त निकम यांची नावे घेतल्यानंतर कुणाचेच हात वर नव्हते. मात्र अमोल कोल्हे यांचे नाव घेतल्यावर सर्वांनी हात वर केले. तेव्हा अजित पवार म्हणाले की,तुम्हाला हवा तोच उमेदवार दिला जाईल.जनतेच्या पसंतीचा उमेदवार देऊ.पण नंतर मात्र ज्यांना तुम्ही टीव्हीवर पाहता त्यांना फक्त पाहू नका तर त्यांच्या नावासमोरील बटण दाबा,अशा शब्दात कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
मोदी सरकारवर टीका करताना पवार म्हणाले की,सध्या जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे,त्याबाबत शंकेची सुई फिरत आहे.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने असे काहीतरी घडेल,असे अमेरिकन गुप्तचर संघटनेने सांगितले होते. राज ठाकरे यांनी अशी शक्यता वर्तवली आहे.सध्या घडलेल्या घटना संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला तुल्यबळ उमेदवार सापडत नव्हता. येथे सलग तीन वेळा शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव विजयी झाले आहेत. आता कदाचित शिवाजीराव आढळराव आणि अमोल कोल्हे यांची लढत होऊ शकते.