राधाकृष्ण विखे पाटील प्रचारातून अलिप्त राहणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुलाने भाजप जवळ केल्याने विधानसभेतील विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गोची झाली आहे. युती वर टीकेची झोड.उठवायची तर मुलगा भाजपचा उमेदवार अशा कात्रीत सापडलेल्या विखे पाटलांनी प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ते म्हणाले की,राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केले,त्यामुळे मी प्रचाराला जाणार नाही. मात्र त्यांचा हा निर्णय नगरपुरता आहे. ते सुजय यांच्याविरोधातही प्रचार करणार नाहीत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय सांगितला.सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रथमच माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार, अशीही चर्चा रंगली होती. परंतु आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल काहीही भाष्य केले नाही.
नगरची जागा आपल्या पक्षासाठी का मागितली, याबद्दल विखे पाटील म्हणाले की,औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेच्या बाबतीत समन्वय साधण्याचा प्रयत्न होता. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात,म्हणून नगरच्या जागेची मागणी केली होती. राष्ट्रवादीनेही काही जागा बदलून मागितल्या होत्या. तीन वेळा राष्ट्रवादी नगरच्या जागेवर हरला आहे. ती जागा आम्ही जिंकू शकतो,असा दावा त्यांनी केला.
पवारसाहेबांनी माझे वडील बाळकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दु:ख झाले.माझे वडील हयात नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नेत्याने टिप्पणी करावी, ही दुर्दैवी गोष्ट आहे.पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे आणि त्यांच्या वक्तव्याने वेदना झाल्या,असे ते म्हणाले.पवारांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केले,त्यामुळे मी प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी आपल्या निर्णयासाठी मांडली.सुजयने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला,तो त्याचा वैयक्तिक होता,असे त्यांनी स्पष्ट केले. आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.