वडिलांचे नाव घेतले तर तुमच्या पोटात का दुखते ?

वडिलांचे नाव घेतले तर तुमच्या पोटात का दुखते ?

मुंबई ‌नगरी टीम

बीड : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची सत्ता असताना जिल्ह्याला खड्ड्यात चालण्याचे काम केले, आम्ही मात्र केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा निधी आणुन जिल्ह्य़ातील रस्ते चकाचक केले आणि याच विकासाच्या बळावर जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल असा विश्वास राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. आम्ही आमच्या वडीलांचे नाव घेतले तर तुमच्या पोटात का दुखते? स्वत: पुढे येण्याची हिंमत न दाखवता अपक्ष उमेदवाराला पुढे करून कसले घाणेरडे राजकारण करता अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

बीड लोकसभेच्या भाजप – शिवसेना – रिपाइं – रासप महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज आष्टी – पाटोदा तालुक्यात झंझावाती दौरा केला. डोंगरकिन्ही येथील सभेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील नगर-बीड-परळी रेल्वे सोलापूरवाडीपर्यंत आली आहे. ही रेल्वे लवकरच परळीपर्यंत येईल असे सांगून त्या म्हणाल्या की, आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच आमदार होते. मुंडे यांना विरोध करण्यासाठीच राष्ट्रवादीने आणखी पाच जणांना विधान परिषदेवर घेतले. त्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला नेहमी पानेच पुसली. आमचे भाऊही मोठ्या ऐटीत राष्ट्रवादीत गेले. कुणी दिलं का दिलं त्यांना मंत्रीपद? मी भाजप सरकारमध्ये मंत्री झाल्यावरच त्यांच्या नावापुढे नामदार पद लागलं असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था राष्ट्रवादी व कॉंग्रेस सरकारच्या काळात अत्यंत दयनीय झाली होती. राष्ट्रवादीने जिल्हा खड्ड्यात घातला. मात्र भाजपा सरकार आल्यानंतर आणि मी पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील रस्ते चकाचक होत आहेत. मुंडे साहेबांचे स्वप्न अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीडच्या सभेत मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करू असे आश्‍वासन दिले आणि स्पेशल पर्पज व्हेईकलमध्ये या रेल्वेमार्गाचा समावेश करून तब्बल २८०० कोटी रूपये दिले. यामुळे बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडीपर्यंत आता रेल्वे आली आहे असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

प्रितमताईंच्या पाठपुराव्यामुळे केंद्राकडून जिल्ह्यात १० हजार कोटींच्या रस्त्याची कामे सुरू आहेत. मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना नगर- अंमळनेर- डोंगरकिन्ही मार्गे नगर हा रस्ता केला होता त्यानंतर या रस्त्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनी एक टोपली खडीसुद्धा टाकली नाही. मात्र, मी पालकमंत्री झाल्यानंतर आ.भीमराव धोंडे यांच्या मागणीनंतर हा रस्ता पुन्हा एकदा केला. मुंडे आणि धोंडे यांच्यासोबत आता आ.धस आल्याने आमची ताकद आता आष्टीत वाढलेली आहे. मुंडे-धोंडे- धस- दरेकर अशी आमची वज्रमुठ झालेली असल्याने समोरचा उमेदवार आमच्यापुढं टिकू शकत नाही. गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने शंभर टक्के शौचालये बांधली. प्रधानमंत्री आवास योजनेतून एकही व्यक्ती बेघर राहणार नाही याचा विचार केला गेला. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची पालक होऊन सर्वांगीण विकास केला. त्याचमुळे आष्टी मतदारसंघातून ‘न भूतो न भविष्यती’ असे मताधिक्य प्रितमताईंना मिळेल. स्वत: पुढे येण्याची हिंमत न दाखवता अपक्ष उमेदवाराला पुढे करून स्व.गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावल्याचा आक्षेप आमच्याविरुद्ध घेण्यात आला. माझे बाबा गोपीनाथराव मुंडे यांचे नांव आम्ही वापरल्याने यांच्या पोटात का दुखतंय? असा सवाल त्यांनी या वेळी केला.

प्रितमताईंनी कोट्यावधींचा निधी आणून स्वकर्तृत्वावर जिल्ह्याचा विकास केला आता पुन्हा एकदा त्या निवडणुकीत उभ्या आहेत. त्यांच्यासमोर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्याची ताकद नसलेला, भविष्य नसलेला उमेदवार उभा आहे. त्यामुळे प्रितमताईंना मोठं मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी प्रितमताईंना तुमच्या ओटीत घालते त्यांना तुम्ही सांभाळाल याचा मला विश्‍वास आहे आणि त्यांच्या विजयाचा गुलाल खेळण्यासाठी मी नक्की आष्टी मतदारसंघात येईल, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी आ.सुरेश धस यांनी आपल्या भाषणात बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जिल्ह्यात चांगली माणसे उरलेली नाहीत. जाती-पातीत विद्वेष पसरविण्यासाठी विरोधक सोशल मिडियाचा गैरवापर करत आहेत. प्रितमताईंचा विजय निश्‍चित असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खालच्या दर्जाचे किळसवाणे राजकारण घडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या गावचा सरपंच राष्ट्रवादीचा, गाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचं त्या गावात व्यक्तीगत भांडणं झाली त्याचंही राजकीय भांडवल करणार्‍यांना जनता या निवडणुकीत माफ करणार नाही. पंकजाताई आणि प्रितमताई या स्वत: महिला असल्याने त्यांना महिलांचं दु:ख माहित आहे असेही ते म्हणाले. या सभेला पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही व परिसरातील भाजपा, शिवसेना, रासप, रिपाई व महायुतीचे पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleप्रवीण गायकवाड यांना पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी ?
Next articleअसले फितूर वाघ असू शकत नाहीत :अजित पवार