असले फितूर वाघ असू शकत नाहीत :अजित पवार

असले फितूर वाघ असू शकत नाहीत :अजित पवार

मुंबई ‌नगरी टीम
मुंबईःभाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगर मतदरासंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उपस्थित होते. यामुळे राज्यातील विरोधी पक्षांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. एकेकाळी अमित शहा यांना अफजल खान यांची उपमा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यासोबत हजेरी लावल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना असले फितूर वाघ असूच शकत नाहीत,असे म्हटले आहे.

अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की,५ वर्ष एकमेकांना ‘पटकणारे’, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात. असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही’. शिवरायांच्या नावाने मते मागणे म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.

पाच वर्षे शिवसेनेने भाजपवर जोरदार आणि कडाडून टीका केली.ठाकरे यांनी तर चौकीदार चोर आहे,अशी टीका केली होती. तरीही ऐन निवडणुकीच्या अगोदर मात्र ठाकरे यांनी युती केली आणि अमित शहा उमेदवारी अर्ज भरतानाही हजेरी लावली. शिवसेना आता या टीकेला कसे उत्तर देते,याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Previous articleवडिलांचे नाव घेतले तर तुमच्या पोटात का दुखते ?
Next articleबीड जिल्हा अतिसंवेदनशील जाहीर करा : धनंजय मुंडे